काटी : उमाजी गायकवाड
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठातील माजी न्यायमुतीॅ मा.बॅरिस्टर बी.एन.देशमुख (काटीकर)उर्फ तात्यासाहेब तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी. त्यांचे वडिल कै भाई नरसिंहराव देशमुख हे उस्मानाबाद येथील सुप्रसिद्ध वकील सर्वसामान्यांचे,दिनदलिंताचे, शेतकरी, शेतमजूर कष्टकऱ्यांचे वकील म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात ख्याती होती.
बॅरिस्टर बी.एन.देशमुख (काटीकर) यांचे मामा कै.भाई उध्दवराव पाटील हे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे एक अध्वर्यू नेते. एक डाव्या आघाडीचे नेते म्हणून संबंध महाराष्ट्र भर त्यांची ओळख होती व बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांचे बालपणही काटीत व त्यांच्या मामाच्या सानिध्यात गेल्याने साहजिकच डाव्या विचारसरणीचा पगडा लहान वयातच आपोआपच पडला होता. मामाच्या सहवासात असल्यामूळे मार्क्स ,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, यांच्या विचारसरणीचे बाळकडू त्यांच्या बालमनावर लहान वयातच मिळाले.
कामाच्या व्यापामुळे आपल्या काटी या गावी फारसे येणे-जाणे नसले तरी गावासाठी त्यांनी केलेल्या कार्यावरुन आपल्या भुमीबद्दल वाटणारी त्यांची आत्मियता प्रकर्षाने जाणवत असायची.
1971-1972 साली बॅरिस्टर बी.एन.देशमुख व तत्कालिन सरपंच अॅड.भैरिनाथराव साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह तत्कालीन विद्युत मंडळ बोर्डाचे संचालक रामराव आवरगावकर यांना भेटुन केलेले विद्युत पुरवठ्यासाठीचे प्रयत्न गावासाठी हितकारी ठरले व गाव प्रकाशमय झाले.
1993 साली किल्लारीला भूकंप झाला या भूकंपात अनेकजण गाडले गेले या परिस्थितीत शासनाकडून कमकुवत झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या भूकंपात काटीतील अनेक घरांना तडे गेले होते.परंतू येथे कुठलीही जिवितहानी झाली नव्हती. सदर गाव अनुदानापासुन वंचित राहिले होते.त्यावेळी येथील गावकऱ्यांनी गाव पुरातन व इतिहासकालीन असल्याचा पुरावा देवुन सदर अनुदान मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी बॅरिस्टर बी. एन. देशमुख साहेबांनी कायद्याच्या चाकोरीत राहुन आपल्या भुमीबद्दल अनुदान मिळवुन दिले.त्यामुळे गावातील प्रत्येक घरावरील छप्पर निघाल्याने व सिमेंट काँक्रीटची घरे झाली तसेच येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या संपुर्ण शाळेवर स्लॅप पडला. यामुळे गावचे रुपच पालटलेले दिसत आहे.
27 ऑगस्ट 1981 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना औरंगाबाद येथे झाली. औरंगबाद खंडपीठाच्या स्थापनेमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा होता.अॅड.बी.एन.देशमुख साहेब उर्फ तात्यासाहेबांनी गावातील कोर्ट केसेच्या भांडणामध्ये आपल्या वडिलांचा कै.अॅड.नरसिंहराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कधीही एका जणांची बाजू न घेता वाद आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये आहे. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. विषयाचे सखोल ज्ञान, विचारशक्ती, व सर्वात महत्वाचा गुण म्हणजे विनयशीलता व आपला मुद्दा पटवून देण्यातील त्यांची कसब आदी गुणामुळे ते मुंबई उच्च न्यायालयातील श्रेष्ठ व नामवंत वकील बनले.उच्च न्यायालयाच्या वैभवात उच्च परंपरेचा अंगीकार करून भर टाकली.
तत्कालिन मुख्यन्यायमुतीॅनी त्यांच्या कर्तत्वाने भारावून जावून 1976 मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमुतीॅ बनण्याची विनंती केली. परंतु त्यांनी त्यांचे मामा भाई उध्दवराव पाटील यांचा सल्ला घेतला व त्यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाच्या चार भिंतीच्या आत बसुन न्याय-निवाडे करण्यापेक्षा समाजामध्ये राहुन समाजसेवा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी त्यावेळी नम्रपणे न्यायमुतीॅ बनणण्यास नकार दिला. त्यांच्या मामासारखाच त्यांच्या मनावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. त्यावेळी जर साहेबानी उच्च न्यायालयाचे न्यायमुतीॅपद भूषविले असते तर कदाचित त्यांनी सवोॅच्च न्यायालयाचे सरन्यायाधिशपदही भुषविले असते. त्यांनी आपला वकिली व्यवसाय हा एक पवित्र व्यवसाय मानुन वकिली केली. या आपल्या वकिली व्यवसायाचे बाजारीकरण केले नाही.त्यांना समाजकार्याची आवड होती, गोरगरीबांच्या पैशाच्या अडीअडचणी त्यांना माहित होत्या.कारण शेतकऱ्यांच्या अडचणीची व्यथा त्यांनी फार जवळुन पाहिल्या होत्या, गरिबी काय असते हे त्यांनी जाणले होते.त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या या व्यवसायाने लाखो रुपये कमवून ऐषआरामाचे व चैनीचे जीवन ते सहजपणे जगू शकले असते कारण तेवढी विद्वत्ता, नैपुण्य ,कौशल्य, त्यांच्याजवळ नक्कीच होते.त्यांनी आयुष्यभर दिन-दुबळ्याची गरिब, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वकिली केली.त्यांनी आपल्या वकिली व्यवसायात कुठल्याही पक्षकारांशी फीस ठरवून कधीही वकिली केली नाही, मग तो पक्षकार गरिब असो की श्रीमंत पक्षकार जी काय फिस देईल त्यात समाधान मानून प्रामाणिकपणाने आपले काम करित राहायचे हा त्यांचा स्वभाव होता.फिस कमी दिली म्हणुन ते पक्षकारावर कधीच नाराज होत नसत.
1986साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमुतीॅ म्हणुन नियुक्ती झाली या त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी दिले.त्यांनी या दहा वर्षाच्या कालखंडात दिलेले निवाडे वाचून पाहिल्यास अनेकांना स्फुतीॅ देणारे ठरतील.त्यांनी दिलेले निवाडे व्यक्तीसापेक्ष नसून समाजसापेक्ष आहेत मग तो निवाडा शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणुन असेल, इंजिनिअरींग प्रवेशासंबंधी असेल, डी.एड, बी.एड., मेडिकलसाठी असेल, भुकंपग्रस्तांसाठी असेल किंवा कामगारांना समान कामास समान वेतन नाकारणाऱ्या शासना विरुद्ध असेल, स्वातंत्र्य सैनिकांच्या पेंन्शनबाबत असेल, त्यांनी दिलेल्या प्रत्येक निवाड्यातुन व्यक्तीपेक्षा समाज दिन-दुबळ्या शेतकरी, कष्टकरी दलित, विद्यार्थी वर्ग प्रतिबिंबीत होतो.परंतु हे सर्व करीत असताना त्यांनी कायद्याच्या चौकटीचा भंग कधी केला नाही, न्यायालयीन प्रक्रियेचा, घटनेचा, संहितेचा संकोच केला नाही.
सतत दहा वर्षे औरंगाबाद खंडपीठात न्यायमुतीॅपद मोठ्या दिमाखात गाजविले याचा आम्हा काटीकरांना सार्थ अभिमान आहे.
बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांचा राजकारणातही मोठा सहभाग होता आपल्या काॅलेज जिवनातही ते महाविद्यालयीन निवडणूकामध्ये सक्रिय सहभाग रहायचा.त्यांचे मामा भाई उध्दवराव पाटील यांच्याकडुनच राजकारणाचे त्यांनी धडे घेतले त्यांच्या मामा सारखाच त्यांच्या मनावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक सभा त्यांनी गाजवल्या याच पक्षाच्या व्यासपीठावरुन त्यांनी गोवामुक्ती आंदोलन, कापुस एकाधिकार, सिमा लढा, शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव, शेतमजूराना व कामगारांना किमान वेतन आदी लढ्यावर आंदोलने छेडीत राहिले.एकवेळ ते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी विधानपरिषदही आपल्या वकृत्व चातुर्याने व बुध्दी कौशल्याने गाजविली. विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द अभ्यास पूर्ण राहिली.
ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सत्कार स्विकारण्यास तयार
शुक्रवार दिनांक (25) डिसेंबर 2015 रोजी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.अप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळ उस्मानाबाद येथील एका खासगी कार्यक्रमात माननीय बॅरिस्टर बी.एन.देशमुख यांना भेटुन 81व्या वाढदिवसानिमित्त 19 जानेवारीला सत्कार स्विकारण्याची विनंती केली, परंतु तितक्याच नम्रपणे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आपण सत्कार स्विकारणार नसल्याचे त्यांनी शिष्टमंडळास स्पष्टपणे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी सत्कार स्विकारण्याचा आग्रह धरला. या आग्रहाखातर त्यांनी ग्रामस्थांचा सत्कार स्विकारण्यास तयार झाले परंतु सत्कार हा दुष्काळी परिस्थिती मुळे साधेपणाने करण्याची अट घातली होती. व ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त भ्रम नागरी सत्कार केला.
अशा या थोर सुपुत्राचे शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काटी गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद ठेवून येथील मुख्य बाजार चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.











