जळकोट, दि.२३ : मेघराज किलजे
नळदुर्ग मंडळ कृषी कार्यालयाच्यावतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खरीप पिकाची माहिती देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील चिकुंद्रा, मानेवाडी, मुर्टा या गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन, उडीद, मुग, तूर आदी खरीप पेरणी ते काढणी संदर्भात शेतीशाळा घेऊन माहिती देण्यात आली.
सध्या कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चातून जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतीशाळेत द्वारे माहिती देण्यात येत आहे. नळदुर्ग मंडळ कृषी कार्यालयाच्या वतीने या शेतीशाळा घेण्यात येत आहेत. यात बियाणे उगवण क्षमता, बीज प्रक्रिया,बीबीएफ पेरणी यंत्र, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, खताच्या मात्रा, निंबोळी अर्क फवारणी, गंधकाचा वापर, माती परीक्षणानुसार खताचे नियोजन आदी संदर्भात विविध पिकांची माहिती देण्यात आली. या शेतीशाळेत पेरणी ते काढणी पर्यंतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. विशेषतः महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
चिकुंद्रा येथील शेती शाळेत शेतीशाळा प्रशिक्षक मुळे, समूह सहायक बनकर माळी, कृषी ताई चिगुताई जाधवर, सरपंच रानबा जाधवर, मंडळ कृषी अधिकारी वा. के. खाडे उपस्थित होते. मानेवाडी येथील शेती शाळेत शेतीशाळा प्रशिक्षक महेश देसाई, समूह सहायक महेश शेकदार, कृषी ताई सविता माने आदीसह कृषी कार्यालयाचे कृषी सहाय्यक डी. पी. बिराजदार व इतर कर्मचारी उपस्थित होते.मानमोडी येथे झालेल्या शेतीशाळेत शेतीशाळा प्रशिक्षक बाबू मंजुळे, समूह सहाय्यक जयसिंग कदम, कृषी सहाय्यक धनराज बिराजदार, कृषी ताई अनिता किल्लेदार आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मानेवाडी येथे सुनील खटके, शहाजी हाके, मनोहर माने, महादेव माने आदीसह कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.मुर्टा येथील शेती शाळेत कुमार मोरे, गोपाळ सुरवसे, अतुल कदम, कृषी विभागाचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.