उस्मानाबाद, दि. 28 : कोरोना विषाणू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून दिनांक 25 जुलै 2020 च्या 00.00 वाजेपासून ते 01 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व मुरुम नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू केली आहे.
तालुका कृषी अधिकारी, उमरगा यांनी दि. 26 जुलै 2020 रोजी उमरगा तालुक्यात क्षेत्रीय पाहणी केलेली आहे. या पाहणीत तालुक्यातील मूग, उडीद, सोयाबीन व मका पिकाची पिक परिस्थिती चांगली असून मूग व उडीद पिकावर मावा व करपा रोगाचा, मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा व सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा तुरळक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत असून सदरील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
उमरगा तालुक्यातील उमरगा व मुरुम शहर वगळता तालुक्यातील इतर ग्रामीण क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात कृषी सेवा केंद्रे असून आवश्यक असणारी औषधे तेथे मिळत नाहीत. त्यामुळे उमरगा व मुरुम शहरातील कृषी सेवा केंद्रे दि. 01 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद राहिल्यास किड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने उमरगा व मुरुम शहरातील कृषी सेवा केंद्रे संचारबंदीच्या कालावधीत ठाराविक वेळेत चालू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी विनंती केली आहे.
तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020-21 या योजनेत खरीप हंगामासाठी सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रे 24x7 चालू ठेवणेस परवानगी देण्यात आली असून बँकांचे कामकाजही चालू राहणे आवश्यक आहे.
त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व मुरुम नगर पालिका क्षेत्रात दिनांक 25 जुलै, 2020 च्या 00.00 वाजेपासून से 01 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये लागू करण्यात आलेले आहे. या संचारबंदीच्या कालावधीत खालील नमूद आस्थापना चालू राहतील असे आदेश जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ मुंडे दिले आहेत.
1) बी बियाणे व खते, किटकनाशके या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगिक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत चालू राहतील.
2) पिकविमा व अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहतील.
या आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.