काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील काटी येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णाचा राहत्या घरासमोरील बसस्थानक परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून तहसीलदार सौदागर तांदळे, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ.अजित राठोड यांनी गावात भेट देऊन येथील कुंभार गल्ली, बसस्थानक परिसर सील करण्यात आला आहे. सावरगाव येथील येथील कोरोनाबाधित रुग्ण बॅंकेच्या कामासाठी काटी येथे आल्यानंतर बॅंकशेजारी असलेल्या त्यांच्या साडूच्या घरी चहापाणी घेतले होते. सावरगाव येथील साडुचे वडील हे तुळजापूर येथील हॉटेल व्यावसायिक असून असून त्यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची पत्नी व त्यांच्या सावरगाव येथील मुलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सावरगाव येथील त्या पॉझिटिव्ह साडुचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील काटीतील त्याच्या साडुसह घरातील चौघांचा स्वॅब घेण्यात आला होता. यापैकी साडूच्या भावाचा रिपोर्ट गुरुवार दि. 16 रोजी पॉझिटिव्ह आला असून गुरुवारी कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील दहा जणांसह त्यांच्या संपर्कातील गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवकासह आणि येथील खासगी डॉक्टर, वैराग (ता.बार्शी) येथील लॅबटेक्निशियन अशा 19 जणांना कोरोंनटाईन करण्यात आले आहे. 



      गावात सध्या बसस्थानक ते बाजार चौक या रस्त्यावर  सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने  या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. यावेळी अतिक्रमणावरुन कोरोनाबाधित रुग्णाच्या जागेचा वादही दोन तीन दिवस सुरू होता. या दरम्यान कोरोनाबाधित रुग्णाचा येथील सरपंच, उपसरपंच,आणि ग्रामसेवकाचा संपर्क आल्याने त्यांचीही धाकधूक वाढली आहे. येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टरने कोरोना बाधित रुग्णांवर सलाईन लावून उपचार केल्याने त्यांच्यासह दवाखान्यातील कंपाऊंडर व वैराग येथील एका लॅबटेक्निशियने रक्त तपासणी केल्यामुळे त्यासही कोरोंनटाईन करण्यात आले आहे. दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांची घाबरगुंडी उडाली असून कोरोनाबाधित कुटूंबातील सदस्यांचा व डॉक्टरचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा चुलता महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत शिपाई म्हणून कार्यरत असून बॅंकेत त्याचा परिसरातील गावातील अनेक ग्राहकाशी संपर्क आल्याने त्यांच्याही रिपोर्टकडे लक्ष लागले आहे. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतिबंधित क्षेत्रातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, जिल्हा मध्यवर्ती बँक, मेडिकल दुकाने पाच दिवस बंद करण्याच्या सूचना दिल्या असून कुंभार गल्ली, बसस्थानक परिसर सील करण्यात आला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवार पासून चार दिवस जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अनेकांची घाबरगुंडी उडाली असून कोरोंनटाईन केलेल्यांचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     परिसर सील करताना तहसीलदार सौदागर तांदळे, आरोग्य अधिकारी डॉ.स्मिता लोंढे, डॉ.अजित राठोड, सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर, अशोक जाधव, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे,पोहेकॉ नाईकवाडी,पत्रकार उमाजी गायकवाड, अनिल गुंड, ग्रा‌.प‌.सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड,अनिल बनसोडे, सुहास साळुंके, सतिश देशमुख, शिवलिंग घाणे,भैरी काळे, नजीब काझी, करीम बेग, हेरार काझी आदीजण उपस्थित होते.
 
Top