नळदुर्ग, दि. 28 : शहरात होत असलेले उपजिल्हा रुग्णालय काम लवकरात लवकर पूर्ण करुन सदरील रुग्णालय सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात नमूद केले आहे की, नळदुर्ग येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्गावर वसले असून परिसरातील 45 ते 50 गावांचा नळदुर्ग शहराशी संपर्क असतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल, तसेच अपघात झालेला असेल किंवा अन्य उपचारासाठी जायचे असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा दु-स-या जिल्ह्यामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या परिस्थितीत सामान्य माणसाला उपचारासाठी अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये या उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाले तर नळदुर्ग शहरासह परिसरातील 45 ते 50 गावांना फार मोठा फायदा होईल.
 
कोरोना महामारीच्या या तीन-चार महिन्यांमध्ये सामान्य नागरिकांना अनेक प्रकारच्या उपचारांसाठी अतोनात त्रास झालेला आहे. सद्य परिस्थितीचा विचार बघता हे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे, ही सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आहे. तरी या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकार्पण करावे, अशी मागणी करण्यात  आली आहे. 

या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस श्री प्रमोद कुलकर्णी,  शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांनी स्वाक्षरी केली आहे.
 
Top