जळकोट, दि. १६ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात जखमी अवस्थेत एक काळवीट काही तरुणांच्या नजरेस पडले. या काळवीटाला या तरुणांनी पाणी पाजवून जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे नेऊन उपचार केले . त्यानंतर या काळवीटाला वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे  सुपूर्द केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळकोट येथील शिवराज स्वामी यांची जळकोट- आष्टा कासार या मार्गालगत जळकोट गावाजवळ शेती आहे. या शेतामध्ये जळकोट येथील  युवा सेनातालुका उपप्रमुख रोहन  पाटील ,वैभव स्वामी, आकाश पटणे, धिरज ढोणे, अजय साखरे  वआकाश औसेकर बुधवार(दि.१५) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या तरुणांच्या नजरेस एक काळवीट जखमी अवस्थेत आडवे पडल्याचे दिसून आले. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या या काळवीटाला या तरुणांनी प्रथम पाणी पाजवले. त्याच अवस्थेत या काळवीटाला जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले. या दवाखान्यात कर्तव्यावर असलेल्या पशुधन विकास अधिकारी डॉ. रेड्डी यांनी काळवीटावर तात्काळ उपचार करून मरणासन्न अवस्थेत असलेल्या काळवीटाला वाचवले. त्यानंतर तरुणांनी वन विभागाशी संपर्क साधून वनाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.

एका वन्य प्राण्याला तरुणांनी वेळीच पाणी पाजून उपचार केले. म्हणूनच या प्राण्याचे प्राण वाचले. प्राण्याच्या या जीवनाबद्दल या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top