तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत तामलवाडी ता. तुळजापुर यांच्या वतीने मास्क न लावणे,दुचाकीवर दोन व्यक्ती प्रवास करणे अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरी गावातील सर्व नागरीकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी पी.एन.लाटकर यानी केले आहे.
देशासह राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन ग्रामीण भागामध्येही कोरोना विषाणूचा शिरकाव होताना दिसत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु अजुनही जनता प्रशासनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही.प्रशासन ,सामाजिक संस्था यांच्यावतीने मास्क वापरण्याच्या सुचना वारंवार देऊनही अनेकजण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत मला काय होतय या भ्रमात राहत आहेत.प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा सांगुनही जनता ऐकत नसल्याने उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी यानी ग्रामपंचायतीला गावामध्ये प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २०० रू. दंड,बाहेर पडताना चेहर्यावर मास्क/स्वच्छ रूमाल न लावणे ५०० रू, दुकान /भाजीपाला विक्रेत्याजवळ ग्राहकांनी सामाजिक अंतर न ठेवणे २०० रू, ग्राहकामध्ये तीन फुट अंतर न राखणे किंवा दुकानासमोर चौकोनी खुणा नसणे ५०० रू., किराणा दुकानदाराने वस्तुचे दरपत्रक न लावणे १००० रू., व दुचाकीवर दोन व्यक्ती दिसल्यास ५०० रू. दंड अशी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन यानुसार तामलवाडी ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली असल्याचे दिसुन येत आहे.तसेच ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वनिक्षेपकावरुन दररोज सकाळी,संध्याकाळी जनजागृती करण्यात येत आहे व घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकावरुनही जनतेला सुचना देण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी पी.एन.लाटकर यानी बोलताना सांगितले आहे. तसेच गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सर्व नागरीकांनी मास्कचा वापर करावा,हात साबणाने स्वच्छ धुवावेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही ग्रामविकास अधिकारी पी.एन. लाटकर यानी केले आहे.