काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सुबक आणि सुंदर गणेश मूर्तींना मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रात मोठी मागणी असते. यंदाच्या गणेशोत्सवात विविध आकाराच्या आकर्षक गणेश मूर्ती येथील हरिदास कुंभार यांच्या कुटूंबियांनी तयार केलेल्या मुर्त्या विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. येत्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी त्या दिवसापासून दिड ते दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला आहे. राज्यात यंदा या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन हा मुख्य नियम कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पाळायचा असल्याने सर्व गणेश भक्तांनी एकत्र येऊन यंदाचा गणेशोत्सव साजरा करणे अशक्य आहे. दरवर्षी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील हरिदास कुंभार यांची शिक्षित नवनाथ व सचिन या दोन मुलांसह कुटुंबियांनी बनवलेल्या आकर्षक रंगरंगोटी केलेल्या विविध वेशभूषेतील सुबक, सुंदर मुर्ती विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. परंतु यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर सर्व सामान्यांपासून सर्वचजण मोठ्या संकटात सापडले आहेत.
सावरगाव येथील गणेश मुर्तीकारनाही कोरोनामुळे चांगलाच फटका बसला आहे. गणेशोत्सव चार दिवसांवर आला असला तरी दरवर्षी लहान गणेश मूर्तीची जवळपास चार हजार मुर्त्यांची विक्री होत असते परंतु यंदा कोरोनामुळे जेमतेम दिड ते दोन हजार गणेश मूर्तीची विक्री झाली असून यंदा गणेश मुर्तीची विक्री होत नसल्याचे व मुर्ती खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने यंदा गणेश मुर्तींच्या विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे सांगून यंदा सरकारच्या नियमावली नुसार चार फुटांपर्यंत गणेश मुर्त्यांची अट असली तर तीन फुटांच्या 30 मुर्त्या बनविल्या असून अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द केले आहेत. त्यामुळे यावर्षी कोरोना संकटामुळे मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे मुर्तीकार नवनाथ कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सावरगाव येथील हरिदास कुंभार यांचा परंपरागत कुंभार व्यवसाय वर्षभर मडकी माठ चुली बनवण्याचे काम कुटुंबियाच्या मदतीने सुरू असते. हरिदास कुंभार यांची सचिन व नवनाथ ही दोन्ही मुले मूर्ती कलेत पारंगत आहेत. या युवा कलावंतांनी यंदा एकाहून एक सरस मूर्ती साकारल्या आहेत. सचिन कुंभार याचे शिक्षण बी.ए. डि.एड. पर्यत झाले आहे परंतु आपला वडिलोपार्जित व्यवसायाकडे वळून शिरुन कुटुंबाला हातभार लावत आहे.
यंदा या बंधूनी दगडूशेठ हलवाई गणपती, राम अवतार, तिरुपती बालाजी, महादेवाच्या पिंडीवरील, लालबागचा राजा, कानकतरी, कमळावर विराजमान झालेला गणपती, टिटवाळा,अष्टविनायक, मोरवाला गणपती, आजोबा गणपती, विठु माऊली , प्रभावळी, चिंतामणी अशा अवतारासह विविध वेशभूषेतील गणेश मूर्ती बनवत आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. मागील चार महिन्यापासून मूर्तीचे काम चालू आहे. यंदा विविध वेशात मूर्ती बनवून दोन्ही बंधूंनी आपली कला विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश मुर्तीसोबत बैलपोळ्यासाठी आकर्षक बैलजोडी तयार केल्या आहेत.
गणरायाच्या आगमनाला अवघे चारच दिवसच उरले असताना अनेक आकर्षक गणेश मुर्ती विक्रीसाठी सज्ज असून हरिदास कुंभार यांचे संपूर्ण कुटुंब अहोराञ झटत आहे. सावरगाव येथील हरिदास कुंभार यांच्या मूर्ती कलेत पारंगत असलेल्या नवनाथ व सचिन या दोन्ही मुलांनी बनवलेल्या मूर्तीस दरवर्षी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात मागणी असते. परंतु कोरोना संकटामुळे त्यांचा परंपरागत गणेश मुर्ती बनवण्याचा व्यवसाय संकटात सापडला आहे.