प्रतिकात्मक

तुळजापूर, दि. 10 : तुळजापूर तालुक्यातील सांगवी काटी येथील ग्रामसेवकाला सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन अटक केली आहे. तर ग्रामसेवकांविरुध्द तुळजापूर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील कारवाई सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

विजय नारायण चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हे सांगवी काटी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई असून त्यांचे शिपाई या पदाचे मंजुरीसाठी व भविष्य निर्वाह निधीचे खाते ऑनलाइन करण्यासाठीचे कागदपत्रे तुळजापूर पंचायत समिती येथे पाठविण्याच्या कामासाठी सांगवी काटीचे ग्रामसेवक चित्ते यांनी सात हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरुन सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी सापळा लावून ग्रामसेवकास तेवढया रकमेची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. 

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार, प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, हवालदार रवींद्र कठारे, पोलीस नाईक मधुकर जाधव, विष्णू बेळे, समाधान पवार, महेश शिंदे, चालक ज्ञानदेव कांबळे यांनी केली आहे.


 
Top