नळदुर्ग, दि. 19 : शहरातील विविध अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था, डुकरांचा हैदोस, पाणीपुरवठा व स्वच्छता बाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडवावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा बुधवार रोजी पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नळदुर्ग शहरातील डी.एड कॉलेज रोड, रहीम नगर रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. या रस्त्याच्या कामाची मंजूरी मिळून निविदा पण निघाली. मात्र या रस्त्याला वर्क आर्डर का दिली नाही? असे सांगून शहरातील बसस्थानक ते किल्ला गेट हा मुख्य रस्ता दुभाजक पद्धत, सुशोभित करून चांगल्या दर्जाचा करावा. तसेच शास्त्री चौक ते हुतात्मा, महामार्गापर्यंत असलेला रस्ता अनेक वर्षापासून खराब झालेला असून सध्या खड्याच्या अवस्थेत अखेरची घटका मोजत आहे. हा रस्ता तात्काळ करावा व नागरिकांची होणारी तारेवरची कसरत थांबवावी. त्याचबरोबर शास्त्री चौक-नानीमा दर्गाह रोड ते महामार्ग पर्यंत जोडणा-या या रस्त्याची चाळण झाली आहे. तर व्यास नगर प्रवेश रस्ता व मराठा गल्ली येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असताना देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांना या चिखलमय रस्त्यातून कसरत करीत वाट काढावी लागत आहे.

कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण असून साथीचे इतर आजार उदभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून पालिकेने तात्काळ सर्वत्र जंतु नाशक फवारणी करावी, त्याचबरोबर डुकरांचे कळप सर्वत्र उछाद मांडल्याने नागरिक वैतागले आहेत. पालिकेने या डुकराचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच बोरीधरणात मुबलक पाणी साठा असताना देखील शहरात अनेक ठिकाणी दहा-दहा दिवस पाणी येत नाही. अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. सदरील सर्व विषयावर पालिकेने योग्य ती कार्यवाही करुन हे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा असा इशारा पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, उपाध्यक्ष निखील येडगे, विभाग अध्यक्ष शिवाजी चव्हाण, यासीन शेख, महेबूब शेख़, दिनेश डोंगरे, आप्पू कोरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top