उमरगा : गो.ल. कांबळे
उमरगा शहरातील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व सुविधांयुक्त रुग्णालयात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास प्रसूती, सिझेरियन व प्रसूती संदर्भातील इतर आजारावरील उपचारास मोफत लाभ घेता येणार आहेत. याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.
या हॉस्पिटलमध्ये एक वर्षाखालील बालकांचे विविध आजार, नवजात शिशूंचे विविध आजार यासाठी लाभ घेता येईल. नागरिकांच्या सोयीसाठी साई हॉस्पिटल येथे शासनाकडून आरोग्यमित्राची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्यमित्र हे पात्र लाभार्थी तसेच इतर माहिती घेतील त्यानुसार पात्र असणाऱ्यास सदर योजनेचा लाभ घेता येईल.
साई हॉस्पिटल येथे दि.१५ ऑगस्ट रोजी सदर योजनेचा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार.प्रा.रवींद्र गायकवाड हे होते तसेच उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे, डॉ.विक्रम आळंगेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, डॉ.अजित शिंदे, डॉ.अनंत मुगळे, डॉ.सिद्राम ख्याडे, डॉ.सचिन तावशीकर, डॉ.सचिन येळापूरे, डॉ.कवठे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय रुग्णालयांत गर्भवती माता व बालकांना उपचार घेणे गैरसोयीचे झाले आहे. या रुग्णालयाचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत झाल्याने हजारो गोर-गरीब गर्भवती महिला व नवजात बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- डॉ. अनंत मुगळे, साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल