नळदुर्ग, दि. 15 : तुळजापुर तालुक्यातील खुदावाडी शिवारात सेंद्रीय पध्दतीने केलेल्या दोन एकर क्षेत्रात सोयाबीन चार फुटापर्यंत पीक बहरले आहे. विशेषत: शेतक-यांना खर्च परवडत नाही म्हणून अनेक वर्षापासून एका बैलावर शेती करुन कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याची जिद्द येथे यशस्वी झाल्याचे शेतकरी सांगतात.
केदारनाथ संगमेश्वर पाटील यांची खुदावाडी ता. तुळजापूर शिवारात पाच एकर शेतजमीन असून ते काही वर्षापासून सेंद्रीय पध्दतीने शेती करीत आहे. यावर्षी त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये घरगुती सोयाबीन बीयाची पेरणी केली. विशेष म्हणजे शेतीला होणारे भरमसाठ खर्च परवडत नाही म्हणून त्यांनी एक बैलावरच शेती करीत आहेत.
सोयाबीनची पेरणी करण्यासाठी पूर्व मशागत करुन पाच टॅक्टर शेण खत घातले. जून महिन्यांमध्ये सोयाबीनची पेरणी केली. गोमुत्र फवारणी केली. तसेच 19:19 ही एक रासायनिक फवारणी केली. सध्या सोयाबीनचे पिक बहरले असून ते चार फुटापर्यंत आले आहे. गतवर्षी एकरी 14 क्विंटल उतारा मिळाला होता. यंदाच्या वर्षी पिकाची परिस्थिती पाहता अधिक उतारा मिळण्याची अपेक्षा पाटील यांनी तुळजापूर लाईव्ह शी बोलताना व्यक्त केली.
खर्च जास्त, उत्पन्न कमी, लहरी निसर्ग चक्राने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे सर्वश्रूत असुन शेतक-यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त सेंद्रीय पध्दतीचा अवलंब करावे, गोधन पाळून त्यांचे मलमुत्र शेतीसाठी उपयोगात येईल, जास्तीत जास्त दुभती जनावरे पाळून यशस्वी शेती व्यवसाय करण्याचे आवाहन केदारनाथ पाटील यांनी केले आहे.