उस्मानाबाद, दि. 11 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने बुधवार पासून उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेमध्ये चालु ठेवण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी आदेश पारीत केला आहे.
कोविड-19 विषाणुमुळे उदभवलेल्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्याकरीता व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजपर्येंत उघडी राहतील. तसेच कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे निकष न पाळल्यास अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट / दुकाने शासकीय यंत्रणेकडून तात्काळ बंद करण्यात येतील.
त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हयात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत चालू राहतील. तर उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास चालू राहील. तसेच उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज 24 तास चालू राहतील.
सर्व प्रकारची औषधी दुकाने, फार्मसी, जन औषधी केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहील. फक्त सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांस संलग्न असलेली मेडीकल्स दररोज 24 तास चालू राहतील.
उस्मानाबाद जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील.
सदरचा आदेश आज दि. 11 ऑगस्ट रोजी दिला आहे.