उस्मानाबाद, दि. 22 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबाद येथे असलेल्या उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली असून याबाबत वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भुमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून योग्यवेळी जाहीर करणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिध्दार्थ मोकळे यांनी आज दि. 22 ऑगस्ट रोजी दिली आहे. 

उस्मानाबाद येथे मिलिंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यानी सदर निर्णयास विरोध दर्शवणारे निवेदन उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे पत्रात नमूद करुन निवेदन पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी अथवा राज्य कार्यकारिणीला विश्वासात न घेता परस्पर देण्यात आले असल्याचे आरोप केले आहे. मिलिंद रोकडे यांनी मांडलेली भूमिका ही वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका नाही. या विषयावर भूमिका मांडण्याचे अधिकार कोणत्याही जिल्हास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांना नाही.विद्यापीठ उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून योग्य वेळी जाहीर केली जाईल, असेही सिध्दार्थ मोकळे यांनी शेवटी म्हटले आहे.


 
Top