मुंबई, दि. 06 : बळीराजा चेतना अभियान ही उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पथदर्शी योजना होती. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला असता या योजनेनंतरही सदर भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या घटलेली दिसून आले नाही, असे कारण देत महाविकास आघाडीच्या सरकारने ही योजना बंद करीत असल्याचा आदेश जारी केला आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये 24 जुलै 2015पासून बळीराजा चेतना अभियान ही योजना तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतक-र्यांच्या आत्महत्या रोखण्याबरोबर त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती. 2018-19 या एका वर्षासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती. पण या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये घट दिसून आलेली नसून योजनेचा प्रभावी परिणाम होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आल्याचे महसूल व वन विभागाच्या जीआरमध्ये नमूद केले आहे.