नळदुर्ग, दि. 02 : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे मोटारसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मयत हा पुण्याहून अचलेर (ता. लोहारा) या गावी जात होता.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सुरेश राजू चव्हाण (वय 35 वर्षे, रा. अचलेर, ता. लोहारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे समजते. सुरेश चव्हाण हा पुण्याहून रविवारी मोटारसायकल (क्रमांक एमएच 25 एक्यू 0561) वरुन अचलेर गावाकडे येत असताना अणदूर गाव ओलांडून नळदुर्ग जवळ आला असता गोलाई समोर ट्रक क्रमांक केए 56 - 1634 यास दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये सुरेश हा जागीच ठार झाला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.