नळदुर्ग, दि. 04 : तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथे सहा वर्षांपूर्वी मंजुर झालेल्या ५० खाटांच्या नूतन उपजिल्हा रुग्णालयाचे काम गेल्या सहा वर्षांपासून संथगतीने चालू आहे. उपजिल्हा रूग्णालय तात्काळ सुरू करावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दि.४ आॅगस्ट रोजी नळदुर्ग येथील नवीन उपजिल्हारूग्णालयाच्या रेंगाळलेल्या इमारतीसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नळदुर्ग ता तुळजापूर येथील सहा वर्षांपूर्वी मंजुर झालेल्या ५० खाटांच्या नूतन उपजिल्हा रुग्णालयाचे काम गेल्या सहा वर्षांपासून निधीअभावी राज्य व जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने लालफितीत अडकल्याने हे काम अतिशय संथ गतीने होत आहे.या कामास गती मिळाली तर नळदुर्ग शहर व परिसरातील ६० ते ७० गावातील लोकांच्या आरोग्याच्या प्रश्न सुटणार असून येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणार्या अपघातातील अपघातग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेकवेळा जिल्हा प्रशासन व राज्यशासनाकडे हे उपजिल्हारूग्णालय सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली. परंतु अद्यापही शासनाने याकडे अजिबात लक्ष न दिल्याने हे काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. शासनाचे लक्ष वेधून हे उपजिल्हारूग्णालय तात्काळ सुरू करावे. यासाठी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ' वतीने आज दि.४ आॅगस्ट रोजी ,नळदुर्ग येथील नवीन उपजिल्हारूग्णालयाच्या रेंगाळलेल्या इमारतीसमोर,मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार, उपतालूकाध्यक्ष राहूल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत, कोविड- 19 च्या नियमांचे पालन करून "घंटानाद "आंदोलन करण्यात आले.
यावेळी नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, उपशहराध्यक्ष रमेश घोडके यांचेसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.