काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 8 रोजी रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये एकाच कुटुंबातील दहा व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये चार पुरुष आणि सहा महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब काटी येथील धनगर गल्लीत राहत आहेत. या कुटुंबातील सदस्य तुळजापूर येथील कोरोनाबाधित नातेवाईकांच्या एका कार्यक्रमात संपर्कात आले असल्याची माहिती कोरोना कक्ष प्रमुख तलाठी प्रशांत गुळवे यांनी दिली. या दहा जणासह काटीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 35 वर पोहोचली आहे.
त्यातील दोघांना त्रास होऊ लागल्याने व कोरोनाबाधित नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने या कुटुंबातील दहाजणांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापुर्वी काटी एकमेकांच्या संपर्कामुळे 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 23 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री 10 कोरोना नमुन्यापैकी उशिरा आलेल्या अहवाला मध्ये एकाच कुटुंबातील दहा पैकी दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काटी मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दहा जणासह काटीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 35 वर पोहोचली आहे.
धनगर गल्लीतील त्यांच्या घराशेजारील परिसर तलाठी प्रशांत गुळवे, आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित राठोड यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सील केला आहे. 25 रुग्णांपैकी 23 रुग्ण बरे होऊन घरी आल्याने व गाव कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना आणखी दहाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे ही अत्यंत चिंतेची बाब असून ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली आहेत.
एकाच दिवशी एकाच कुटुंबातील दहाजण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे काटीकरांची चिंता वाढली आहे. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काटी हे गाव असल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने काही जण क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाबाधित दहाजणांच्या संपर्कातील लोकांची शोध मोहीम सुरू असून संपर्कातील 18 जणांना होम कोरोंनटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाबाधित दहाजणांच्या संपर्कातील आणखी कितीजण क्लोज कॉन्टॅक्ट संपर्कात आहेत याचाही शोध घेणे सुरू आहे. आणखी कितीजणांना कोरोंनटाईन करावे लागणार त्यांचे रिपोर्ट काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून संपर्कातील लोकांची धाकधूक वाढली आहे.
