संग्रहित छायाचित्र

नळदुर्ग, दि. 13 : राज्यात पर्यटनाला चालना देण्याकरिता ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील भुईकोट किल्ल्यात पर्यटन महोत्सवाचे नियोजन करण्याबाबत राज्य पर्यटन संचालनालयाचे संचालक यांच्या आदेशानुसार औरंगाबादचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्यावरुन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचित केले आहे. शासनाच्या या निर्णयाचे पर्यटकांतून स्वागत होत आहे.

ऐतिहासिक नळदुर्ग येथील किल्ला शासनाकडून जतन व संगोपनार्थ सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने गेल्या काही वर्षापूर्वी घेवून किल्ल्याचे रुपडे पालटले आहे. त्यानंतर देश-विदेशातून पर्यटकांनी मोठयाप्रमाणात किल्ल्यास भेटी दिल्या आहेत. मात्र मार्च महिन्यापासून सर्वत्र संसर्गजन्य कोरोना आजाराने हाहाकार माजविले. त्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये याकरीता शासनाने पर्यटनासाठी हा किल्ला बंद केल्याचे युनिटीचे संचालक कफील मौलवी यांनी सांगितले. तसेच किल्ला बंद असल्याने कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. तर किल्ल्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्हयातील नळदुर्ग किल्ला येथे आयोजन करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्यासह संबंधितांना पाठविण्यात यावा. त्यावरुन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी गुरुवार दि. 13 ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आदेशित करुन नळदुर्ग येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत कळविले आहे. त्याचबरोबर नळदुर्ग किल्ला येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्याबाबत कळवून आवश्यक सर्व कागदोपत्रासह जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन विभागास तात्काळ पाठविण्याबाबत आदेश दिले आहे. 


 
Top