चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी व परिसरात मागील आठवडाभर झालेल्या रिपरिप पावसामुळे चांगले आलेल्या सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी व माशाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या किटकनाशक फवारणी कडे वळला आहे.
चिवरी ता. तुळजापूर परिसरात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. यंदा पेरणीसाठी वेळेवर पाऊस आल्यामुळे पिके चांगली आली आहेत. मात्र सोयाबीन फुले बहरत असताना व काहींचे शेंगा भरत असण्याच्या अवस्थेत या पिकावर पाने कुरतडणारी अळी, व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. अळ्या शेंगा पोखरत असल्यामुळे उत्पादनात घट होईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
दरम्यान फवारणीसाठी शेतक-ची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सोयाबीन पिकासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरी महागडे कीटकनाशक फवारत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत आहे. शेतकरी आता या संकटाच्या मालिकेचा सामना करत असताना पिके जोमात असतानाही केवळ किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पुन्हा अडचणीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.