खानापूर : बालाजी गायकवाड
तुळजापूर ते काटगाव बससेवा बंद असल्याने तालुक्यातील काटगाव, चव्हाणवाडी, खानापूर, नांदुरी या भागातील नागरिकांना व विद्यार्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी तुळजापूर-काटगाव या मार्गावरील बससेवा चालू करावी, यासाठी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले.
सध्या शैक्षणिक प्रवेश प्रकिया चालू झाल्याने विद्यार्थांना तालुक्याला जावे लागत आहे. परंतु बससेवा बंद असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पर्यायी अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु अवैध वाहतुकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक केली जाते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद करण्यात आली होती. मिशन बिगेन अंतर्गत जिल्ह्याअंतर्गत आता ब्राह्यजिल्ह्याबाहेर बससेवा चालू करण्यात आली आहे. पण अद्याप ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणच्या बससेवा चालू करण्यात आली नाही. तालुक्यातील मोजक्याच ठिकाणाची बससेवा चालू करण्यात आली आहे. जिल्हाब्राह्य प्रवास करण्यास विनापासची परवानगी देंण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील बससेवा चालू करण्यात यावी अशी मागणी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी,तालुकाप्रमुख शशिकांत मुळे,महादेव चोपदार,लहू कोरे,नितीन चेंडके,मनोहर चेंडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.