नळदुर्ग, दि. 20 : एसटीची कोरोनामुळे विसावलेली चाके अखेर गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजीपासून पुन्हा महामार्गावरुन धावू लागली आहेत. मात्र प्रवाशांतून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. तर एसटी बस उस्मानाबाद जिल्हयातील बससस्थानकात ये-जा करीत असल्याने बसस्थानके गजबजू लागले आहेत.
दि.२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. तसेच दि.२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजीपासून राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा सुरु झाली आहे. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता नळदुर्ग येथील बसस्थानकात उमरगा-सोलापूर ही एसटी बस चालक पंडीत सुरवसे व वाहक बिराजदार यांनी घेवून आले. यावेळी माजी नगरसेवक सुधीर हजारे, वाहतूक नियंत्रक ज्योती दस, एसटी चालक विजयकुमार कांबळे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, अमर भाळे आदीजण उपस्थित होते.