उस्मानाबाद, दि. 20 : उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज गुरुवारी आदेश दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची बदलीचे आदेश अद्याप निघाले नाही.
उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालक पदी कार्यरत होते.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या जागी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सध्याचा पदाचा कार्यभार अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रीमती मुधोळ मुंडे यांच्याकडून स्विकारण्याचे आदेशित केले आहे.