खानापूर : बालाजी गायकवाड
महसूल विभागात कोतवाल सेवकांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, तसेच किमान वेतन देण्यात यावे यासह त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तुळजापूर तालुका कोतवाल संघटनेच्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
कोतवाल सेवकांना महसूल विभागात चतुर्थश्रेणीचा दर्जा देऊन किमान वेतन देण्यात यावे यासह त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तुळजापूर तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केले आहे की, कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्ण ही या पात्रता असून तुटपुंज्या पगारावर हे कोतवाल काम करीतआहेत. कोतवाल प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. शासकीय कामकाजामध्ये सरकारी साक्षीदार म्हणून कोतवाल फार मोठी भूमिका बजावत असतात. शासनाने राज्यातील कोतवालांच्या भवितव्याचा विचार करून महाराष्ट्र राज्याच्या हिताच्या दृष्टीने वेतनाचा विचार करणे गरजेचे आहे. राज्याच्या महसूल विभागातील महत्त्वाचा घटक म्हणून कोतवालांकडे पाहिले जाते. गावातील प्रत्येक घरांची,शेतांची अचूक माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना गावातील महसूल गोळा करणे व टपाल वाटप करणे सोयीचे जाते.राज्यातील वाढत्या महागाईचा विचार करता वयाच्या पन्नास वर्षानंतर पंधरा हजार रुपये मानधन पुरेसे नाही. त्याऐवजी कोतवाल सेवकांना महसूल विभागात चतुर्थश्रेणीचा दर्जा देऊन किमान वेतन दिले पाहिजे हे राज्याच्या दृष्टीने हिताचे आहे. किमान वेतन लागू केले तर कोतवालांना समाधानकारक जीवन जगता येईल. त्यासाठी राज्यातील महागाईच्या निर्देशांकाचा विचार करून महसूल विभागाने योग्य पाऊल उचलले पाहिजे. सरकारी स्तरावर लिपिक तसेच इतर अधिकारी यांचा पगार चांगलाच वाढला आहे. कोतवालाचे कामही लिपिकासारखेच असते. पण त्यांना ते फायदे दिले जात नाहीत. सरकारने कोतवालांच्या समस्यांचा माणुसकीच्या नात्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.गावातील प्रत्येक माणसाशी घट्ट नाते जोडणा-या कोतवालांची समस्या सरकारने तातडीने सोडवण्याची आवश्यकता आहे.अन्यथा एक दिवस नक्कीच याचा उद्रेक होऊ शकतो, असे मत तालुकाध्यक्ष हणमंत क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तुळजापूर तालुकाध्यक्ष हणमंत क्षीरसागर, सुरेश वाघमारे, औदुंबर गिरी प्रकाश चंदनशिवे यांच्यासह पदाधिकाऱ्यां स्वाक्षऱ्या आहेत.