नळदुर्ग, दि. 30 : देशातील गावे, वाडी, वस्ती पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यात आली. मात्र तुळजापूर तालुक्यातील हगलूर गावांतर्गत असलेल्या बंजारा समाजाची वस्तीपर्यंत आजही रस्ताच नाही. रस्त्याअभावी ग्रामस्थांचे ऐन पावसाळ्यात प्रचंड हालअपेष्टा सोसतच ये-जा करावी लागते. सर्वाधिक फटका रुग्ण, वयोवृध्द, लहान बालके, महिलांना सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी उस्मानाबाद जि.प. च्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर तालुक्यातील हगलुर या गावाच्या बाजूस हगलूर तांडा असून याठिकाणी 300 लोकांची वस्ती आहे. सदर तांडयाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत डांबरी रस्ता झालेला नाही. सद्यस्थितीत असलेला रस्ता हा कच्चा स्वरुपाचा व दगड चिखलांचा आहे. सदर रस्त्याचे आजपर्यंत कधीही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याने पायी जाणे सुध्दा अडचणीचे असून मोटारसायकल किंवा इतर वाहने त्या रस्त्याने जावुच शकत नाहीत. त्यामुळे सदरील रस्ता होणे आवश्यक असून हगलूर पाटी ते हगलूर गावामध्ये जाणा-या रस्त्याला जोडलेला हगलूर तांडा रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर ॲड. जयपाल पाटील, सतीश दराडे, अण्णासाहेब दराडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top