नळदुर्ग : सचिन गायकवाड

तुळजापूर, नळदुर्ग, अणदुर, चिकुंद्रा, मानेवाडी, हगलूर तसेच गाव खेड्याची तहान भागवणारा बोरी धरणाची परिस्थिती जैसे थे असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जवळपास ६० टक्के शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. बी बियाणे खत औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात केले असून दुबार पेरणी नंतरही सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कमी प्रमाणात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाबरोबर आर्थिक संकटाने ही घेरले आहे. 

यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह तुर, उडीद, मुग, वाया जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यंदा वरूणराजा बरसलाच नाही. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पाऊस चांगला पडेल या आशेवर खरीप हंगामात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळ, जळकोट मंडळ, तसेच सलगरा दिवटी मंडळांमध्ये सोयाबीन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यापासून खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या पिकांना पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह तुर, उडीद, मुग, पिकांनी माना टाकले आहेत. येत्या दोन ते चार दिवसांत पाऊस नाही पडल्यास सोयाबीन, तूर, उडीद, मुग वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे 


 
Top