नळदुर्ग, दि. 04 : शहर व परिसरातील अनेकांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली आर्थिक फ़ायदयाचे आमिष देवून शेकडो ग्राहकांची आर्थिक फसवणूक करून कोटयवधी रूपयाना गंडा घालणाऱ्या संबंधित कंपनीविरुध्द पोलीसात तक्रार देवून संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, भुमी प्रॉपकॉन प्रा.लि. या कंपनीचे कार्यालय नळदुर्ग येथे पूर्वी होते. शहर व परिसरातील लोकांकडून मासिक हप्ते गोळा केल्याचे आरोप करुन त्याची मुदत संपून देखील कंपनीने त्या ग्राहकाना पैसे परत न दिल्याने संबंधितानी मनसे कड़े न्याय मागितले. मनसेच्या पदाधिका-यानी त्याची दखल घेऊन संबंधित कंपनीच्या चेअरमनशी संपर्क केला. परंतु फोन बंदच होता. त्यानंतर सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही कंपनी या ठिकाणीही असेच केल्याची माहिती देवून सांगलीत हे ऑफिस नाही, येथून पसार झालयाचे कळवले व नळदुर्ग येथील ग्राहकाच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना केल्या. वास्तविक पाहता अशा कंपन्यावर वचक असणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरील कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, जनहित कक्ष व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष अॅड. मतीन बाड़ेवाले, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे, उपाध्यक्ष निखील येडगे यांच्या स्वाक्षरी आहेत.
