जळकोट : मेघराज किलजे
लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक वर्गीय हक्क परिषदेच्या पदाधिकारी समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे महिला व बाल विकास व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ही बैठक होत आहे.
महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मंत्रालय येथे बैठक होत आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे मराठवाडा संघटक व राज्याचे महिला व बालविकास व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांच्या प्रयत्नातून ही बैठक लागली आहे. संघटनेच्या समान काम समान पदनाम समान पदोन्नतीचे टप्पे समान वेतन समान अधिकार या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या शासकीय व निमशासकीय लिपिकांच्या प्रश्नाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक वर्गीय हक्क परिषदेचे अध्यक्ष विजय बोरसे व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या प्रयत्नातून व संघटनेचे गजानन देसाई, बापूसाहेब कुलकर्णी, मुकुंद पालटकर, शिवाजी खांडेकर, श्रीकांत गायकवाड, सूर्यकांत इंगळे, गिरीश दाभाडकर, उमाकांत सूर्यवंशी आदि पदाधिकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संघटनेचे प्रलंबित लवकर सुटतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
