जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवासी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व होर्टी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सह शिक्षक बालाजी माळी यांची राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी तर दयानंद जवळगावकर यांची तालुकाउपाध्यक्षपदी पी.के. राठोड यांची सरचिटणीसपदी तर माजी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी वाय. के. चव्हाण यांची मार्गदर्शकपदी निवड झाल्याबद्दल जळकोट येथे विविध शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व मित्र परिवाराच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जळकोट येथे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष डी. डी. कदम हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत मिटकर, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव धनंजय मुळे, होर्टी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अंगुले, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ इटकरी, जळकोट संभाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक धनराज रेणुके, पतसंस्थेचे माजी चेअरमन सी. बी. स्वामी, शिक्षक समितीचे कमलाकर येणेगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी ओबीसी चळवळ कायम सुरू ठेवून संघटनेसमोरील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे बालाजी माळी यांनी स्पष्ट केले. मान्यवरांनी मनोगतातून नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. जळकोट शिक्षकमित्र परिवाराने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर येणेगुरे यांनी केले. तर आभार समीर जाधव यांनी मानले.