खानापूर : बालाजी गायकवाड
गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून वरूणराजा बरसला नसल्याने ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनचे पिक कोमेजून जात आहे. सध्या सोयाबीन बीया भरण्याच्या अवस्थेत आहे. यासाठी मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे. परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून वरुणराजाचा बरसला नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
ऑगस्ट महिन्यात रिमझिम पाउस पडल्याने अळ्यांचा व किड्यांचा वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सोयाबीनवर किड्यांचा व अळींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.किडे व अळ्या सोयाबीनचे पाने व बिया कातरत आहेत. पावसाने जर अशीच ओढ दिली तर सोयाबीनच्या उत्पादनात नक्कीच घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्याने बिया भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन करपून जात आहे.सुरवातीपासून जेमतेम पाऊस पडत गेला.या पावसावर पिके चांगली बहरली .परंतु ऐन बिया भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकरी वर्ग धास्तवला आहे. सुरवातीपासून मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरी कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.यामुळे सिंचनाद्वारे पाणी देणेही शक्य नाही. हि परिस्थिती अशीच राहिली तर यंदाचा हि खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे.मात्र पेरणीपासूनच शेतकऱ्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सुरवातीस दुबार पेरणीचे संकट त्याचा खर्च त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यावेळी पावसाने साथ दिल्याने सोयाबीनची वाढ चांगली झाली काही ठिकाणचे सोयाबीन तर कंबरेएवढे उंच आले मात्र ऐन शेंगा लागण्याच्या व बिया भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हि परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या संकटाला सोमोरे जावे लागणार आहे.
