जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनावरांच्या लाळखुरकत या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरणचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी गावचे सरपंचपती संजय माने, पत्रकार मेघराज किलजे यांच्या हस्ते गाईचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. कृष्णा रेड्डी यांनी या आजाराबाबत सांगितले की, हा आजार विषाणूजन्य आजार असून हा आजार फक्त दोन खूर असणाऱ्या जनावरांमध्ये होतो .या आजारामध्ये जनावरांना सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर ताप येतो. तसेच जनावर चारा खात नाही व तोंडामध्ये फोड येऊन पुरळ येऊन ती फुटतात व जनावरांच्या जीभेवरचा कातडे निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी जखमा होतात. जनावरांना चारा खाता येत नाही तसेच दोन खुरांच्या मध्ये फोड आल्यामुळे व जंतू संसर्ग झाल्यामुळे जनावरांना चालता येत नाही. हा आजार विषाणुजन्य असल्यामुळे या आजारावर कोणताही रामबाण असा इलाज नाही. त्यामुळे हा आजार झाल्यानंतर जनावरांचे दूध उत्पादन कमी होते भूक मंदावते जनावरांची काम करण्याची शक्ती कमी होते. जनावरांना धाप लागते क्वचित प्रसंगी या आजारामुळे जनावरांमध्ये गर्भपातही होऊ शकतो हा आजार होऊ नये. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे लसीकरण ,लसीकरणामुळे जनावरांना हा आजार होत नाही. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत नाही .शासनाच्या या पशु रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत या आजाराची लस टोचण्यात येत आहे .या आजाराची लस टोचल्या पूर्वी जनावरांना कानात बिल्ला मारण्यात येणार आहे व याची नोंद इनाफ पोर्टलवर घेण्यात येणार आहे. जेणेकरून सदर जनावर कोणत्या जातीचा आहे. कुणाच्या मालकीची आहे. दूध उत्पादन किती आहे व त्याला यापूर्वी कोणता आजार झाला आहे का ?किंवा कोणते लसीकरण करण्यात आले आहे. या बाबत माहिती या पोर्टलवर वेळोवेळी अपडेट करण्यात येणार आहे. त्यामुळे जनावरांची विक्री झाल्यानंतर देखील त्या जनावरावर पूर्ण माहिती ती या पोर्टलवर असणार आहे. तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळ खुरकूत रोगाचे लसीकरण करून घ्यावे व शासनाच्या या महत्वाकांशी लसीकरण मोहीमेस पशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. कृष्णा रेड्डी यांनी केले आहे.
या लसीकरण मोहीम कार्यक्रमास सचिन राठोड, सैदोबा कारले, सेवक काशिनाथ मुडे, अतुल लोखंडे, सुनील साखरे, शिवराज राचेट्टी, सुरज अंगुले, विकास चव्हाण, गोपाळ सगर, लहू कारले, बालाजी पालम पल्ले, बाळू कदम, विकास चव्हाण, शिवराम महामुनी आदी पशुपालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, दवाखान्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
