तुळजापूर : कुमार नाईकवाडी

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिपाची पिके वाया गेल्यामुळे राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री शंकराव गडाख यांना दिलेल्या निवेदनामध्ये ‍माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे जिल्ह्यात आपत्तीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के सोयाबीन व इतर सर्व पिके काढणीला आली असताना पावसामुळे वाया गेले आहेत. शेतकऱ्याला तातडीची हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी जगू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत, जे शेतकरी नदी आणि ओढ्या शेजारी शेती करतात त्यांची अवस्था अत्यंत विदारक आहे. आजही शेतामध्ये पाणी उभे आहे असे चित्र आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याशी संपर्क केल्यामुळे त्यांनीही या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असल्याचे माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

 
Top