नळदुर्ग : एस.के.गायकवाड
गेली दोन दिवस उत्तरा नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नळदुर्ग ता. तुळजापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नळदुर्ग या बँके समोर रोडलगत पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः तळ्याचे स्वरूप आल्याने खातेदार ग्राहकांची दिवसभर तारांबळ उडाली. तर नळदुर्ग ते वागदरी रस्ता चिखल पाण्याने भरुन गेल्याने वाहन धारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली.
गत वर्षापेक्षा या वर्षी पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. नळदुर्ग येथील बोरी धरणासह परिसरातील एकही साठवण तलाव भरलेला नाही. हे जरी खरे असले तरी अल्पशा पावसाने जमा झालेल्या पाण्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्गा लगत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ग्राहकांना बँक व्यवहारासाठी गुडघ्याइतक्या पाण्यातून बँकेत ये जा करावी लागली. त्यामुळे दिवसभर ग्राहकांची तारांबळ उडाली.
सध्या राष्ट्रीय महामार्गावर रोडचे सिमेंट बाधकाम चालू आहे. त्यामुळे रोडची उंची वाढली असून रोडलगत मोठे खड्डे पडलेले आहेत. ते दगड माती व खडीने भरून घेणे गरजेचे आहे. अन्यथा सरत्या पावसाळ्यात मोठ्या पावसाची शक्यता असून कायम स्वरूपी बँकेच्या समोर पाण्याचा डोह उभा राहणार आहे. पण ह्या रोडलगतच्या खड्ड्यात भर घालणार कोण हा मोठा प्रश्न आहे. संबंधित ठेकेदार, बँक की नगरपरिषद या त्रिकूटात हा खड्डा सापडलेला आहे. नेमके कोण हा खड्डा भरून काढील व ग्राहकांची बँकेत येण्याजाण्याची सोय करेल हे येणारा काळचं ठरवेल. पण सध्या ग्राहकांची तारांबळ उडाली आहे.
तसेच नळदुर्ग ते वागदरी सहा कि.मी.रस्ता सिमेंटच्या रस्ता बांधकामासाठी खोदून ठेवला आहे. परंतु शेतकऱ्यानी आडवणूक केल्याने या रस्त्याचे काम दोन वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामूळे पावसाळ्यात हा रस्ता चिखल पाण्यात भरून गेल्याने या रस्त्यावरुन वहान धारकांना ये जा करण्यात मोठी कसरत करावी लागते. तरी या रस्त्याबांधकामाला त्वरित सुरुवात करावी असी मागणी होत आहे.


