नळदुर्ग, दि. 27 : नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय दि. 2 ऑक्टोबर रोजी सुरु करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. इमारत उभारणीचे काम संथगतीने संबंधित ठेकेदार करीत आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे कोविड सेंटर उभारण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. या रुग्णालयाचे उर्वरित काम ठरवून दिलेल्या कालावधीत पुर्ण करण्याची गरज आहे.
संसर्गजन्य कोरोनामुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील 60 ते 70 गावातील नागरिकांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याच्या हालचाली दोन आठवड्यापूर्वी सुरु झाले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी रुग्णालय उभारण्याची मंजुरी शासनाकडून मिळवली होती. त्यानंतर वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने इमारतीचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे. शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्याची सेवा मिळावी, याकरीता यापुर्वीच उपजिल्हा रुग्णालय चालू होणे गरजेचे होते. सध्याच्या कोरोना संकटात हे रुग्णालय चालु झाल्यास नागरिकांना सोयीचा ठरला असता. कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. सोलापुरातही अशीच अवस्था आहे. नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन माजी मंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून इमारतीसाठी निधीची मागणी केली होती. संबंधितांनी रुग्णालय सुरु करण्यासाठी व निधी देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता गपाट यांनी नळदुर्ग येथे भेट देवून पाहणी करुन उर्वरित कामे पुर्ण करुन घेण्याचे कंत्राटदारास सांगितले. दि. 2 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याचे निश्चित झाले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही आंदोलन करुन प्रयत्न केले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता उपजिल्हा रुग्णालय सुरु होण्याची शक्यता धुसर झाली आहे. कारण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत. त्याचबरोबर रुग्णालयांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.
