नळदुर्ग, दि. 27 : स्वत: सह कुटूंबास स्वच्छतेच्या कामात वाहून घेतलेल्या व सामाजिक जाणिवेतून विविध क्षेत्रात समाजसेवा म्हणून काम करत असताना उच्चशिक्षित युवकाने एक वेगळाच आदर्श समाजासमोर निर्माण करत समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित असलेल्या मनोरुग्ण व्यक्ती, बेवारस, वेडसर अशा व्यक्तींना माणुसकीच्या नात्याने आधार देत पुनर्वसन करण्यासाठी धडपड करणे, कपडा बँकेच्या माध्यमातून गरजूंना मदत करणे, अपघातातील जखमींना तात्काळ मदत करणे, हरवलेल्या मुलांना चाईल्ड लाइनच्या माध्यमातून सुखरुप घरी पोहचवणे इत्यादी विविध क्षेत्रात स्वखर्चाने कुटूंबियासह धावून जाण्याचे मौलिक कार्य तुळजापुर येथील लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे हे गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून लाकडाऊनच्या काळात शहरातील लोकसेवा फाऊंडेशन, लोकसहभाग व शिवभोजनाच्या माध्यमातुन अनेक बेवारस, मनोरुग्ण, भटके व गोरगरिबांना शहरातील विविध भागात स्वत: जाऊन अन्न (शिवथाळी) पोहच करीत आहेत.
लॉकडाऊन व जनताकर्फ्यु मुळे लोकांवर वावरण्यास आलेली बंधने तसेच रोजगार उपलब्ध नसल्याने पोटभरण्यास देखील होणारे हाल पाहुन ही अन्नदान चळवळ लोकसहभागातुन सुरू केली. यासाठी उस्मानाबादहुन दररोज 100 ते 110 शिवभोजन थाळी मागवली जाते. यासाठी शहरातील अनेक मान्यवर तसेच फाऊंडेशन मार्फत खर्च केला जातो.
पंकज शहाणे यांचे मूळ गाव आलूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे असून सामाजिक कार्याची आवड असलेले त्यांचे वडील फौजदार शंकरराव शहाणे यांनी सन 1971 मध्ये फौजदारची नोकरी सोडून प्राध्यापकाची नौकरी करणे पसंत केले. पंकज शहाणे यांनाही वडिलांचा तो सामाजिक कार्याचा गुण वंशपरंपरेने त्यांच्यामध्ये आला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव लहानपणीच पंकज शहाणे यांच्यावर पडला. रसायन शास्त्रात उच्च पदवी घेवून काही काळ एका खासगी कंपनीत नौकरी केली. मात्र तेथे त्यांचे मन रमेनासे झाले आणि मग त्यांनी सन 2006 ते 2008 या कालावधीत शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) क्षेत्रात नावलौकिक मिळवत उस्मानाबाद श्री, धाराशिव श्री यासह विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारुन अनेक पुरस्कार पटकाविले. ते सलग चार वेळा जिल्हा चॅम्पियन होते.
पंकज शहाणे यांनी सन २०१४ मध्ये गुरूवर्य शंकरराव शहाणे ट्रष्टची स्थापना, सन २०१८ मध्ये लोकसेवा फाँऊंडेशनची स्थापना केली आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे प्रशासनावर ताण पडतो. ही बाब पंकज शहाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी कुटूंबियासह मंदीर, बसस्थानक, शासकीय कार्यालय येथे सन 2008 पासून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छतेचे कार्य करत असताना त्यांची आई सुषमा, पत्नी स्नेहल, चार वर्षाची मुलगी प्रांजल हे उत्स्फुर्तपणे सहभागी होतात. हे कार्य करत असताना अनेक ठिकाणी गरीब लोकांच्या अंगावर फाटके, मळलेले कपडे पाहून कपडा बँक ही संकल्पना सन 2012 पासून राबविण्यास सुरुवात केली. उस्मानाबाद जिल्हयात वाडी, वस्ती, गावात जावून आतपर्यंत 11 हजार गरजूंना कपडे, छत्र्या वाटप केले आहेत.
शहाणे यांना असणारी शरिरसौष्ठवाची आवड व स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव यातुन ते युवकांना व्यायाम व व्यसनमुक्तीचे संदेश देतात. त्याचबरोबर युवकांना व विविध ग्रंथालय आणि वाचनालयाला त्यांनी आपल्या संग्रहातील 150 पुस्तकांचे मोफत वाटप केले. या सर्व कार्याची दखल घेवुन त्यांना व त्यांच्या फाऊंडेशनला अनेक राज्यस्तरीय व सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले. यात गया फाऊंडेशन पुणे, नळदुर्ग न.प. चा पुरस्कार असे अनेक पुरस्कार भेटले. हे सर्व कार्य करताना अनेक अडचणी आल्याचे शहाणे सांगतात. ते पुढे सांगतात की, हे सर्व कार्य ते राजकीय हेतुने अथवा प्रसिध्दीसाठी करत नसुन त्यांना तुळजापूर शहरात निस्वार्थ व विधायक सेवाभाव म्हणुन कार्य करणा-या कार्यकर्त्यांची एक फळी उभी करण्याचे ध्येय असल्याचे ते सांगतात.
सध्या त्यांनी लोकसहभागातुन शहरातील विविध ठिकाणी वाढलेले गाजर गवत काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कारण 10 ते 12 दिवसापासुन पडणा-या पावसाने गवत वाढले असुन त्यातुन डास वाढणे व डेंगु मलेरिया या आजाराचा होणारा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रोगांची तसेच कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. त्यासाठी गवत काढणे आवश्यक असुन याची सुरूवात त्यांनी स्वत:च्या गल्लीतील शेजा-यांचे सहकार्य घेवुन केली आहे. तरी शहरातील विविध ठिकाणच्या सहकार्य करण्यास उत्सुक व्यक्तींनी त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
