येरमाळा, दि. 18 : अज्ञात इसमाने अनोळखी मोबाईल नंबरवरून एकास फोन करून सात हजार रूपयेचा रिवार्ड कंपनीकडुन पाठविले असल्याचे सांगुन बोलते करत जवळपास 1 लाख रूपये गंडवुन ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना बाभळगांव ता. कळंब येथे घडली. याप्रकरणी पोलिसात दि.17 ऑक्टोंबर रोजी अज्ञात इसमाविरूध्द फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश नवनाथ वाघमारे, रा. बाभळगांव, ता. कळंब यांना दि. 11.10.2020 रोजी 09.15 वा. सु. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला की, फोन पे हेड ऑफिस मधुन बोलत आहे, तुमचा 7,000/-रु. चा रिवार्ड कंपनीकडून पाठवला आहे, तो स्विकारण्यासाठी नोटीफिकेशन तपासुन पे करा. असे सांगुन अविनाश वाघमारे यांना त्या फोनवरील व्यक्तीने बोलते ठेवले. यावर अविनाश वाघमारे यांना आलेले ओटीपीचे संदेश त्यांनी वाचून खात्री न करता फोनवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीस पुन्हा पुन्हा सांगीतल्याने त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीने अविनाश वाघमारे यांच्या बँक खात्यातील एकुण 96,997/-रु. टप्प्याटप्प्याने काढून घेवुन अविनाश वाघमारे यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या अविनाश वाघमारे यांनी दि. 17.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.