उस्मानाबाद, दि. 16 : संत मुक्ताई राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराचे वितरण येथील संत मुक्ताई मंदिरात संपन्न झाले.
अक्षर मानव उस्मानाबाद व संत मुक्ताई मंदिर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा 2029 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार 'माझ्या हयातीचा दाखला' या डॉ. विशाल इंगोले, लोणार बुलढाणा येथील कवीच्या कविता संग्रहास प्राप्त झाला.
या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून मराठी कवितता लेखनाला प्रेरणा मिळावी म्हणून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोख रक्कम दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन पुरस्कार प्राप्त कवींचा सन्मान केला जातो. श्रीमती मंगल ताई वाघ यांच्या सहकार्यातून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. डॉ. रुपेशकुमार जावळे यांच्या संयोजनातून आणि कष्टातून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील जवळपास 56 कवितासंग्रह प्राप्त झालेले होते. याचे निःपक्षपाती परीक्षण करून 'माझ्या हयातीचा दाखला' या विशाल इंगोले यांच्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आलेली आहे.
विजय गायकवाड यांच्या शुभहस्ते तर ज्येष्ठ लेखक माधव गरड यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक अंतर राखून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कवितासंग्रहाचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ. शिवाजी गायकवाड यांनी ही कविता वर्तमानाला सोबत घेऊन प्रवाही होते. तसेच ती माणसांच्या दुःखाच्या मुळाशी हात घालण्यात यशस्वी झालेली आहे. हे मत मांडले.
अध्यक्षीय समारोपात माधव गरड यांनी विशाल इंगोले यांची कविता ही सबंध मानवी जगण्याचे दुःख घेऊन साकार होते. तसेच माणसांच्या जगण्याला नवा विश्वास देते हे मत स्पष्ट केले. प्रस्तुत पुरस्काराच्या परीक्षण समितीमध्ये प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड ,कवयित्री वंदना कुलकर्णी, व सौ अश्विनी दाट यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्काराचे संकल्पक डॉ. रुपेश कुमार जावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी तर आभार प्रा डॉ. कृष्णा तेरकर यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी उस्मानाबाद येथील गझलकार बाळ पाटील तसेच इतर साहित्यिक उपस्थित होते.
