हन्नुर : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील हरणा नदीला पूर आले असून पुराचे पाणी गावात शिरले आहे. जवळपास 550 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
मंगळवार आणि बुधवार दोन दिवस तुळजापूर व नळदुर्ग येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे हरणा नदीला पूर आला आहे. तसेच कुरनुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. कुरनुर धरणातील ब्याक वाटरमुळे पितापुर गावात पाणी शिरले आहे. यामुळे गावातील साडेपाचशे लोकांना समाजमंदिर आणि हनुमान मंदीरात स्थलांतर करण्यात आले आहे.
पुरामुळे पितापुर येथील नागरीकांचे सर्व संसार उपयोगी वस्तू वाहून गेले आहेत. यामुळे नागरीकांचे उपासमार होत आहे. पाण्यामुळे गावात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून दलदल निर्माण झाले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
गटविकास अधिकारी महादेव कोळी, तलाठी विजय पवार, ग्रामसेवक संदीप पासंगे, पोलिस पाटील सैफन फकीर, सरपंच अमिना सगरी, मल्लिनाथ हक्के, पितापूर येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सहकार्य केले. मंडळ अधिकारी राजेंद्र कोळी यांनी नुकसानीची पंचनामा केला आहे. तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी पितापूर येथील नागरिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
