जळकोट : मेघराज किलजे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना दि.१६ रोजी निवेदन देण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत तात्काळ जाहिर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील सोयाबीन, ऊस,तूर,मका,कांदा,द्राक्ष,डाळींब तसेच भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या व काढून रानावर वाळणीसाठी पसरविलेल्या सोयाबीनचे पूर्णतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कांही भागात तर अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे सोयाबीनच्या गंजीही वाहून गेल्या आहेत.या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे.खरेतर या वर्षीच्या खरीप हंगामापासूनच शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे.
सुरूवातीला बोगस बियांण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट,त्यानंतर कोरोनामुळे दुधाचे भाव कमी झाल्याने शेतीला जोड असलेला दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.तसेच यावर्षी कांद्याचे भाव कमी झाल्याने आणि कांदा सडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला.व त्यानंतर भाव वाढल्यास केंद्र सरकारने निर्यातबंदी करून शेतकर्यांना अडचणीत आणले.अतिवृष्टीमुळे मूग,उडीदही शेतकर्यांच्या हातून निघून गेले.हे सर्व होत असताना शेतकरी सरकारकडे टाहो फोडून नुकसान भरपाईची मागणी करित आहे. परंतु सरकार नेहमीप्रमाणे, पंचनामे करू,नुकसान भरपाई देऊ.अशी पोकळ आश्वासने देऊन शेतकर्यांना वेड्यात काढण्याचे काम करित आहे.असेही नमूद करण्यात आले आहे.
तरी शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची ठोस मदत तात्काळ जाहिर करावी.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी दिला आहे.
