अचलेर : जय गायकवाड
उमरगा तालुका गुणवत्ता कक्ष आयोजित माझी शाळा- माझे उपक्रम या लेखमालेचे प्रकाशन गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती येथे पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्ताराधिकारी श्रीमती काझी, राजेंद्र कानडे, बाळासाहेब महाबोले, केंद्रप्रमुख सुभाष चव्हाण, श्रीमती शिला मुदगडे, सुशीलकुमार चौगुले, राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या श्रीमती सरीता उपासे व गुणवत्ता कक्ष सदस्य बालाजी भोसले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सदर लेखमालेमध्ये तालुक्यातील एकूण २९ उपक्रमशील शिक्षक व शिक्षिकांचे त्यांनी आपल्या शाळेमध्ये राबविलेले वेगवेगळे उपक्रम व कार्याचा लेखाजोखा मांडला आहे.
उमरगा तालुका गुणवत्ता कक्ष नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करत असतो.उमरगा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या नवनवीन उपक्रमांची माहिती या पुस्तकातून मांडली आहे. जिल्हा परिषद शाळेनी नवनवीन प्रयोग करून गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नानी शाळा बदलल्या आहेत. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी या उपक्रम पुस्तिकेचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत सभापती सचिन पाटील यांनी मांडले येत्या काळात अधिकाधिक शिक्षकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
देशातील नामवंत तंत्रस्नेही संदीप गुंड यांची कार्यशाळा,कुमठे बीट अभ्यास दौरा, विविध कार्यशाळा,शैक्षणिक लेखांची मालिका व लॉकडाऊनच्या काळात ६५ हजार रूपयांचे कीट वाटप करून गुणवत्ता कक्षाने शैक्षणिक व सामाजिक कार्यातही आपला वाटा उचलला आहे.
मुलांसाठी ऑनलाईन नृत्य व निबंध स्पर्धा तर शिक्षकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजूषा, गीतगायन व शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. तसेच गुणवत्ता कक्ष व राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उमरगा यांच्या वतीने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्याना प्रमाणपत्रे व पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कुलदीप कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतूक करून शिक्षकांनी केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सभापती सचिन पाटील यांनी यापुढे असेच नवनवीन प्रयोग तालुक्यातील शिक्षकांनी राबवावेत व त्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुका गुणवत्ता कक्ष काम करत आहे.यापुढेही असेच काम चालू रहावे असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी भोसले , सूत्रसंचालन , पुष्पलता पांढरे तर आभार शिवकुमार बिराजदार यांनी मानले.
