नळदुर्ग, दि. 15 : गेल्या तीन दिवसापासुन नळदुर्ग शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडून सर्वत्र हाहाकार उडाला. गेल्या चोवीस तासात 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर 96 तासात 258 मि.मी. पाऊस झाल्याने यंदाच्या वर्षीही पावसाने सरासरी ओलांडली आहे. या अतिवृष्टीमुळे नळदुर्ग शहराजवळून वाहणा-या बोरी नदीला पुर आले. या पुराचे पाणी मराठा गल्ली व गवळी गल्ल येथील 30 ते 35 घरांमध्ये बुधवारी शिरले होते. मात्र रात्रीतुन या पुराचे पाणी ओसरल्याने अनेक कुटूंबियानी सुटकेचा श्वास घेतला आहे.
नळदुर्ग शहरात मंगळवारी राञी ते बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. मागील चार दशकानंतर पहिल्यांदाच मराठा गल्ली व गवळी गल्ली येथील नदीपात्रा शेजारील घराच्या उंबरठ्यापर्यंत पाणी पोहचले. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची तारांबाळ उडाली. दरम्यान शहरातील सर्वच भागातून बोरी घाटावरील पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करत होते. नगरपालिका आपत्ती निवारण पथकाने मराठा गल्ली व गवळी गल्ली येथील पुराची पाहणी करुन नागरिकांना सतर्कतेचा सुचना दिल्या. दरम्यान, मराठा गल्ली व गवळी गल्ली येथील बोरी नदीची पाणी पातळी राञीतून झपाट्याने कमी झाली आहे.
