नळदुर्ग, दि. 15 : शहरातील नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या मायक्रो फायनान्स कंपनी कडून बचत गटाचे कर्ज घेतले आहे. परंतु गेल्या मार्च पासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र  लॉकडाऊन होते. यामुळे उद्योग व्यवसायावर आर्थिकदृष्टया मोठा परिणाम झाला असून आताची परिस्थिती ही आर्थिक संकटात सापडल्या सारखीच आहे. अशात मुजोर फायनान्स कंपन्या कर्जाची हप्ते भरण्यासाठी तगादा, बळजबरीने, दमदाटी, क्रेडिट स्कोर खराब करण्यासाठी धमकावणे, बँकेच्या नोटिसा येणे, बळाचा वापर करून कर्ज वसुली करणे असे प्रकार निदर्शनास अनेक ठिकाणी आलेले आहे. 

यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अेक वेळा आवाज उठवला आहे. त्यामुळे सक्तीने कर्ज वसूली थांबवली असली तरी सद्य परिस्थिती आर्थिकदृष्ट्या बिकट असल्यामुळे व्यापार व अनेक छोटे व्यवसायिक उध्वस्त झाले असल्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. यांना दिलासा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण बचत गटाची कर्जमाफी करावी यासाठी राज ठाकरे हे शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढून पाठपुरावा करीत आहेत. तसाच विराट मोर्चा नळदुर्ग शहरात काढून प्रशासनाचे लक्ष वेधून व मुजोर फायनान्स कंपन्याला वठणीवर आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने तमाम माता-भगिनींना मायक्रो फायनान्स कंपनीच्या बचत गटांची कर्जमाफी मिळावी, यासाठी मोर्चाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विविध भागात बचत गटांच्या महिलांसोबत बैठका घेण्यात येणार आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी पहिली बैठक व्यास नगर येथे शहराध्यक्ष अलिम शेख व सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पाडली.

 
Top