अचलेर : जय गायकवाड
अशोका विजयादशमी व ६४ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सरकार भिमराज ग्रुप मुरूम यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मुरूम ते सिद्धार्थ बुद्ध विहार गुलबर्गा येथे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी काढण्यात आलेल्या धम्म प्रचार व प्रसार रथ यात्रा अभियानास उत्तम प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय मुरूम (भीमनगर) येथे माजी नगरसेवक शरणाप्पा गायकवाड यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्दाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी सामुदाईक त्रिसरण पंचशील घेण्यात आले.येथूनच या अभियानास सुरुवात झाली.
मौजे सालेगाव ता. लोहारा येथील विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्तीचे दर्शन करून ही धम्म प्रचार व प्रसार यात्रा गुलबर्गा कडे निघाली. गुलबर्गा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे पोहचताच तथागत भगवान गौतम बुध्दाच्या मूर्तीचे सर्वांनी दर्शन घेऊन बुद्ध वंदना घेण्यात आली. यामध्ये पंधरा रे वीस गावामधून तरुण बांधव सहभागी झाले होते.
गुलाबपुष्प लावून डेकोरेट केलेली तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने या वैचारिक अभियानाची सांगता झाल्या बद्दल या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आनंदकुमार कांबळे, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे उमरगा तालुकाध्यक्ष किरण गायकवाड, आकाश गवई व सहभागी सर्व धम्म बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.