नळदुर्ग, दि. 27 : नळदुर्ग शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अरविंद बेडगे यांनी त्यांचा मुलगा आरूषच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन राठोड या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलास दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन आदर्श पायंडा पाडला आहे.
समाजामध्ये वाढदिवस साजरा करताना अनेक जण लाखो रुपयांची उधळपट्टी करतात पण बेडगे दांपत्य याला अपवाद ठरले आहे.ॲड. अरविंद बेडगे यांनी जय हिंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. तसेच ग्रामीण भागातील गरजू लोकांची अत्यंत नाममात्र फी घेऊन कायदेविषयक हक्क मिळवून देतात.त्यांच्या पत्नी अपर्णाताई बेडगे याही राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करतात.
नळदुर्गच्या उपनगराध्यक्षा असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन नळदूर्गकरांची सेवा केली आहे. वात्सल्य सामाजिक संस्थेने अनाथ, गरजूवंत, आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्या 23 मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. त्यापैकी सप्तशृंगी वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे प्रथम वर्षात शिकणाऱ्या अर्जुन राठोड या मुलास सदरील मदत देण्यात येणार आहे. या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक उमाकांत मिटकर,विश्वस्त मनोजकुमार जाधव प्रवीण म्हमाने,ॲड.अरविंद बेडगे अपर्णाताई बेडगे,उद्योजक सुरेश अरबळे उपस्थित होते.