काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील होनाडमधील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे पाताळगंगा विद्यालय, होनाड शाळेतील एम.जी. राऊत (काटीकर) हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने पाताळगंगा विद्यालय, होनाड येथील प्रशालेच्या वतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत नुकताच सेवानिवृत्त शिक्षक एम.जी. राऊत यांचा  ऋणनिर्देश समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रणपिसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, चांदीची भेट वस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी राऊत सरांच्या मागील 33 वर्षाच्या कालखंडातील कार्याचा दाखला देत सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत राहण्याचे आवाहन केले.

    सत्कारमूर्ती एम.जी. राऊत यांनी सत्काराला उत्तर देताना  माझ्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मागील आठवणींना उजाळा देत प्रशालेतील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. व मला घडविण्यात माझ्या  आई-वडिलांसह मला नेहमी सहकार्य करणारे माझ्या गावातील मित्र चंद्रकांत काळे, स्व.रामचंद्र काळे, दिपक कुलकर्णी, बाळु कुलकर्णी आणि ग्रामस्थांचे महत्त्वाचे योगदान असल्याची भावना व्यक्त केली.

      यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रणपिसे, सर्व शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top