नळदुर्ग, दि. 06 : शहरात मोकाट फिरणा-या डुकरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याबाबत डुकर पाळणा-यांना मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेने बोलावून शेवटची संधी म्हणून येत्या पंधरा दिवसात सर्व डुकरांचे विल्हेवाट लावावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर जाहीर निविदा काढून डुकरांची विल्हेवाट न.प. प्रशासन लावणार, संबंधितांचे होणा-या नुकसानीस संबंधितच जबाबदार राहतील, असे सांगुन डुकर पाळणा-या व्यक्तींकडून नगरपालिका प्रशासनाने लेखी लिहून घेतले आहे.
नळदुर्ग शहरात मुक्त संचार करुन डुकरांनी हैदोस घातल्याने वैतागलेल्या नागरिकांनी नगरपालिकेस वारंवार तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन मंगळवारी नगरपालिकेत मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या समक्ष डुकर पाळणा-या रामा कोळी व त्याच्या पाच ते सहा सहका-यांना समज देण्यात आली. तसेच त्यानी यावेळी पंधरा दिवसाच्या आत शहरातील डुकरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचे लेखी पालिकेस लिहून दिले.
यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, पत्रकार सुनील बनसाडे, नगरसेवक शहबाज काझी, मुश्ताक कुरेशी, बशीर शेख, स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख, खलील शेख, रणजितसिंह ठाकूर, किशोर बनसोडे, वाल्मिक खारवे आदीजण उपस्थित होते.
