जळकोट : मेघराज किलजे 

कोरोना महामारीचा प्रकोप थांबता थांबेना. केंद्र शासन, राज्य शासन, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी शासकीय यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था,  अनेक उद्योजक, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, व्यक्तीगत जनता इत्यादींकडून अहोरात्र कोरोना महामारीवर उपाययोजना करुन नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वयंशिक्षण प्रयोग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब कुटुंबांना मास्क, सॅनिटायझर बाटली,  किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन,  साबण आदी साहित्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. 

संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यासोबतच तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत असलेल्या जळकोट सह एकूण अठरा गाव, वाड्या, तांडे आदी ठिकाणातील गोरगरीब, मजूरदार कुटुंबांसह आरोग्य केंद्रातील कोरोना योद्धे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या, अन्य कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार आदींना एन-९५ मास्क, सॅनिटायझर बॉटल,४  साबण,  किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन आदी साहित्याच्या किट वाटपाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी स्वयंशिक्षण प्रयोग उस्मानाबाद व युनिसेफच्या स्थानिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्री कदम, सुनिता कोळगे, नौशाद रुक मोद्दीन तांबोळी आदींनी सदर किटचे वाटप केले. याप्रसंगी किट स्वीकारताना जळकोट आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विष्णू सातपुते, डॉ. एडके, डॉ. स्वामी, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, डॉ. सुप्रिया मोकाशे, औषध निर्माता व्हनाळे, आरोग्यसेविका ढगे, माळी आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

 
Top