नळदुर्ग : येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना चालु करण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात बैठक होवुन यावेळी कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्यासाकरिता त्वरीत निविदा प्रसिध्द करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यानी साखर आयुक्ताना दिली आहे, अशी माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी दिली.

राज्यातील आघाडी सरकारने साखर कारखाने भाडेतत्वावर देण्याबाबत एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुने साखर कारखाना भाडेतत्वार घेण्यास व कारखाना चालविण्यास सक्षम असे उदयोजक पुढे येणार असुन  पुर्वी शासनाचा नियम पाच वर्षे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय होता. मात्र या आघाडी सरकारने सदरील कारखाने 15 वर्षे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय नुकतेच घेतला आहे.

नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना चालु करण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर आदींनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. सदरील कारखाना सुरु करण्याकरिता सुमारे 15 ते 20 कोटी रूपये दुरूस्तीसाठी अपेक्षित असल्याने 5 वर्षाकरिता कारखाना चालविण्यास कोणीही पुढे येत नव्हते. हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची निविदा लवकरच प्रसिध्द करणार असल्याचे सांगून विकास भोसले पुढे म्हणाले की, सध्या कामगाराचे पीएफ (कामगार भविष्य निर्वाह निधी) सोलापूर यांचे अडीच कोटी रुपये  कारखाना देणे आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून पुढच्या आठवडयात सुनावणी होणार आहे. 

तुळजाभवानी कारखान्याचे कार्यक्षेत्र तुळजापुर तालुक्यात असून या कारखान्याचे 10 हजार 24 शेतकरी सभासद आहेत. तर आजघडीला 10 लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्वत्र पर्जन्यमान चांगले झाल्याने साठवण तलाव, धरण, नदी आदी तुडूंब भरले आहे. त्यामुळे भविष्यात ऊसाची टंचाई जाणवणार नाही. ऊसाचे अधिक क्षेत्र वाढेल.

दरम्यान, मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सहकार आयुक्त (पुणे) शेखर गायकवाड, कारखान्याचे आवसायक एस.पी. रोडगे, विभागीय सहनिबंधक लातुर, जिल्हा उपनिबंधक उस्मानाबाद, जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक व्ही.बी. चांडक आदीजण उपस्थित होते.

 
Top