उस्मानाबाद, दि. 02 : कोरोना संसर्गजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रति प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे. स्वच्छता अंगीकारल्यास भीतीचे कारण नाही असे मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले. जिल्हा स्वयं शिक्षण प्रयोग,युनिसेफ यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी साबण आणि मास्क वाटप कार्यक्रमानंतर उपस्थितांना  कांबळे यांनी मार्गदर्शन केले. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती रत्नमाला टेकाळे, स्वयं शिक्षण प्रयोग युनिसेफच्या नसीम शेख यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये  उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वच्छते संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, covid-19 या रोगाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव पातळीवर आवश्यक अशा सर्व उपाययोजना राबविण्यात आले आहेत. साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखणे आणि जनजागृती करणे यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग आणि युनिसेफ देखील ग्रामीण भागात काम करत आहे ही अभिमानाची बाब आहे.

 जिल्हा परिषदेच्या अध्‍यक्षा अस्मिता कांबळे यावेळी म्हणाल्या की, आज प्रत्येकाने स्वतः आरोग्याविषयी जागरूक राहण्याची गरज आहे. स्वतःबरोबर प्रत्येकाने मी आणि माझे कुटुंब covid-19 पासून सुरक्षित कसे राहील यासाठी जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी व्हायची गरज आहे. वारंवार हात धुणे आणि तोंडाला मास्क वापरणे हाच सध्या covid-19 पासून बचावाचा प्रतिबंधक उपाय आहे. सर्वांनी स्वच्छतेचे महत्व अंगीकारल्यास भीतीचे कारण नाही असेही कांबळे म्हणाल्या. युनिसेफचे बालाजी व्हरकट, प्रशांत सोनवणे किरण माने,शाहिदा मुजावर,सीमा सय्यद, गिरीष धानोरे, आकाश लष्करे यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना मास्क आणि साबणाचे वाटप केले.

 
Top