उस्मानाबाद, दि. 10 : 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी आवश्यक असलेली मतदानपूर्व प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया अतिशय गांर्भीयपूर्वक निवडणूक सुक्ष्म निरक्षकांनी पार पाडणे आवश्यक आहे. तसेच हे मतदान ईव्हीएम मशीनव्दारे न घेता ते छापील मतपत्रिकेवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात कोणत्याही मतदान अधिकारी यांच्याकडून कोणतीही हलगर्जी होता कामा नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी दिले.
येथील प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 05 औरंगाबद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी नियुक्त केलेल्या जिल्हयातील सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते.त्यावेळी श्री. काळे बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवडणूक नायब तहसिलदार चेतन पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना काळे म्हणाले की, या निवडणूकीत सुक्ष्म निरीक्षकांची महत्वाची भुमिका असून ते निवडणूक आयुक्त व निरीक्षक यांचा दुवा आहेत. मतदान केंद्रावर काय काम चालू आहे किंवा कोणत्या प्रकारची गडबड चालू आहे? याची अचूक माहिती सुक्ष्म निरीक्षक यांच्या मार्फत मिळू शकते. सुक्ष्म निरीक्षकानी देखील निपक्षपातीपणे काम करणे आवश्यक असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक मतदान केंद्र मतदानाच्या पूर्वी सॅनिटायझर करण्यात येणार असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची थर्मल मशीन व ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण यांची तपासणी करण्यात येणार आहे, असे त्यांना सांगितले.
तसेच दि.30 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राचे स्थळ पाहून घेणे आवश्यक असून प्रत्येकाकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ओळखपत्राशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यास मतदान केंद्र परीसरात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी काळे यांनी दिली. त्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी वेबव्दारे पाहणी करण्यात येणार असून मतदान करणाऱ्या मतदाराच्या डाव्या हाताच्या अनामिकेला शाई लावणे आवश्यक आहे. मतदानाचा अवधी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजे दरम्याने असला तरी 5.00 वाजण्यापूर्वी जे मतदार मतदान केंद्रात दाखल झालेले आहेत. त्यांना टोकन देवून शेवटच्या मतदाराचे मतदान संपल्याची वेळ निवडणूक विभागाच्या अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत काही शंका असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार चेतन पाटील यांनी मानले या प्रशिक्षणासाठी तालुका नोडल अधिकारी सर्व सुक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.